Saturday, August 16, 2025 04:58:02 PM

दुपारी जेवल्यानंतर डुलकी येते? ही आहे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया.. आजाराचं लक्षण नाही

जेवल्यानंतर झोप येणं ही आजाराची लक्षणं नसून शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पचनासाठी रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूतील सक्रियता कमी होते. जेवणातल्या पदार्थांवर याचं कमी-अधिक प्रमाण अवलंबून असतं.

दुपारी जेवल्यानंतर डुलकी येते ही आहे शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आजाराचं लक्षण नाही

Sleepiness After Having Lunch : दुपारच्या जेवणानंतर अनेकांना झोप येते, खासकरून पोटभर जेवल्यावर. अनेकांना ही एक मोठी समस्या वाटते. कारण, अनेकांना या वेळात थोडी विश्रांती किंवा डुलकी घेणं शक्य नसतं. ही समस्या अनेकांना सतावते आणि कधीकधी तर ऑफिसमध्येही यामुळे लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. पण जेवणानंतरच झोप का येते? चला, याचं उत्तर जाणून घेऊ..
जेवणानंतर येणाऱ्या या झोपेला वैज्ञानिक भाषेत 'पोस्ट-प्रांडियल सोम्नोलेन्स' असं म्हणतात. ही काही काळापुरतीच असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा काही आजार नाही, तर आपल्या शरीराच्या नैसर्गिक जैविक प्रक्रियेचाच एक भाग आहे. काही गोष्टींमुळे ही झोप आणखी वाढते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, जेवणानंतर काही लोकांना जास्त झोप आणि आळस जाणवतो. ज्यांची पचनक्रिया चांगली नाही किंवा ज्यांच्या झोपण्याच्या सवयी बिघडलेल्या आहेत, त्यांना जेवणानंतर झोप येण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय, जेव्हा आपण जेवतो, तेव्हा पचनसंस्थेकडे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि मेंदूकडे कमी होतो. यामुळे आपल्याला सुस्ती किंवा झोप येते.

जेवण पचनसंस्थेत पोहोचताच त्याचे ऊर्जेमध्ये, म्हणजेच ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेत अनेक हार्मोन्स बाहेर पडतात, जे मेंदूला झोप येण्याचा किंवा झोप लागण्याचा संकेत देतात. जर तुम्ही प्रथिने (प्रोटीन) आणि कर्बोदके (कार्ब्स) असलेले पदार्थ जास्त खाल्ले, तर शरीरातील 'सेरोटोनिन' नावाचे झोपेचे हार्मोन वाढते, ज्यामुळे तुमची डोळ्यावर झापड आल्यासारखी स्थिती होणे किंवा सुस्ती येणे ही बाब अगदी नैसर्गिक आहे. 

हेही वाचा - Periods Delaying Pills : मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी औषधांचा वापर कितपत सुरक्षित आहे? जाणून घ्या

याशिवाय, दिवसभरातल्या जेवणापैकी दुपारचं जेवणं थोडसं जड असतं. यात अधिकाधिक पदार्थांचा समावेश होतो. दिवसभरात लागणारी ऊर्जा आणि शरीराची झालेली झीज भरून काढण्यात दुपारच्या जेवणाचा वाटा मोठा असतो. यामुळेच, दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आहारात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असणं. जेव्हा आपण दुपारच्या जेवणात भात, ब्रेड, बटाटे किंवा गोड पदार्थ यांसारखे भरपूर कर्बोदके खातो, तेव्हा शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. इन्सुलिन मेंदूला काही अमीनो ॲसिड, विशेषतः ट्रिप्टोफॅन, पाठवण्यास मदत करते. ट्रिप्टोफॅनपासून र्होटोनिन आणि मेलाटोनिन तयार होतात आणि हे न्यूरोट्रान्समीटर्स झोप आणतात. म्हणूनच, जर तुमच्या आहारात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असेल, तर तुम्हाला झोप येऊ शकते.

यामुळेच, आयुर्वेदात वामकुक्षीचा उल्लेख आढळतो. म्हणजेच, जेवणानंतर काही काळ कोणत्याही वेगवान हालचाली न करता मंद मंद हालचाली आणि कामे काही काळासाठी करणे आणि यानंतर डाव्या कुशीवर वळून अगदी थोड्या वेळासाठी डुलकी काढणे. शेतकरी बांधवांची दिनचर्या काहीशी अशीच असते.

योग्य दिनचर्येनुसार हेच योग्य
सकाळी लवकर पहाटे उठणे, न्याहारी करून शेतातील कामे करणे, थकल्या-भागल्यानंतर काही काळ विश्रांती घेणे आणि दुपारचे जेवण करणे. यानंतर काही काळ डुलकी काढणे. (ही वेळ साधारण भरदुपारची असते. या काळात ऊन जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतातील कामे काही काळासाठी थांबवली जातात. याच काळात पशू-पक्षीही विसावा घेतात.) थोडे ऊन कमी झाल्यानंतर पुन्हा सर्वांची कामे दिवस मावळेपर्यंत सुरू राहतात. हीच दिनचर्या खरं तर सर्वांसाठी उपयुक्त असते. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हे वेळेचं गणित पार बिघडून गेलं आहे. पण शरीर हेही एक जीवशास्त्रीय घड्याळच आहे. ते वेळ विसरत नाही आणि आपल्याला योग्य ते संकेत देत असते. मात्र, आपण आपल्या जीवनशैलीमुळे या संकेतांनुसार वागू शकत नाही. परंतु, मानवी जीवन योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी हीच जीवनशैली आवश्यक आहे. दिनचर (दिवसा जागणारे आणि रात्री झोपणारे) प्राण्यांसाठी हेच योग्य आहे. तर, निशाचर (रात्री जागणारे आणि दिवसा झोपणारे) प्राण्यांसाठी वेगळे वेळापत्रक निसर्गाने आखून दिलेले आहे. प्राणी निसर्गानुसार जगतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मधुमेह, रक्तदाब असे 'लाईफस्टाईल डिसिजेस' मानवाच्या तुलनेत फारसे आढळत नाहीत.

हेही वाचा - Intrahepatic Pregnancy : ही गर्भधारणा असते खूप धोकादायक; आईचं यकृत फुटू शकतं!

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री