मुंबई: रोजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या रोजच्या गोष्टी वेळेवर करु शकत नाही. खाण्यापिण्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे पित्त होण्याच्या समस्या निर्माण होतात. मनाच्या अस्वस्थतेमुळे झोप नीट होत नाही. तसेच चहा-कॉफीसारख्या पेयांचे अतिसेवनामुळे पित्त होण्याची शक्यता असते. या पित्ताचा प्रचंड त्रास होत असतो. काही ऍलोपॅथिक तीव्र औषधांनी पित्त होऊ शकते. कदाचित दिवसभरात पुरेसे साधे स्वच्छ पाणी न प्यायल्यामुळे देखील पित्ताचा त्रास जाणवतो.
पित्त होण्याची कारणे
जास्त तिखट आणि तेलकट खाणे, पुरेशी झोप न होणे, खाण्याच्या आणि झोपण्याचा वेळा बदलणे, बाहेरील खाद्यपदार्थ खाणे इत्यादी पित्त होण्याची कारणे आहेत.
हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशींना करावा लागणार आव्हानांचा सामना
पित्त न होण्यासाठी काय टाळावे
जास्त तेलकट आणि तिखट खाणे टाळा. जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्याच पालन करा. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्य तितके टाळा. कोकम सरबत किंवा आमसूलचा आहारात वापर करत राहा. अंगावर पित्त उठत असेल तर घरातील आमसूल पित्त उठत असलेल्या जागेवर चोळा, जास्त पित्त खवळले तर कोकम सरबत किंवा आमसूलचे पाणी करून प्या. कारण पित्त हे शरीरात तयार होणे गरजेचेचं असते. फक्त त्याचे प्रमाण संतुलित राहिले पाहिजे. पित्त कमी तयार होत असेल किंवा जास्त प्रमाणात तयार होत असेल तर ते आरोग्याला चांगले नसते.
उपाय
पित्त झाले असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा. सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने पित्त कमी होते. खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही पित्तापासून आराम मिळतो. नेहमी पित्ताचा त्रास होणार्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या. रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धुवून चघळली तरी पित्त कमी होते. नियमित तुळशीचे सेवन पित्त मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे. जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते. तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते. मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो. पित्ताच्या उलट्या होत असतील तर फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या. उलटया त्वरीत थांबतात. आमसूल यालाच कोकम किंवा रतांबा असेही म्हणतात. आमसुलापासून तेलही निघते. ते व्रणरोपक व तळपायांच्या भेगांवर उपयोगी आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)