Sunday, August 17, 2025 04:10:49 PM

मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त भाजपाचे 47 चौकांमध्ये शक्तीप्रदर्शन

30 मार्च रोजी पंतप्रधान मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी नागपूरला येणार आहेत.

मोदींच्या नागपूर दौऱ्यानिमित्त भाजपाचे 47 चौकांमध्ये शक्तीप्रदर्शन

नागपूर: गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येणार असल्याने भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे. या निमित्ताने शहरातील 47 प्रमुख चौकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शहरभर चौकांची आकर्षक सजावट केली जाणार आहे. 

30 मार्च रोजी पंतप्रधान मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी नागपूरला येणार आहेत. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर ते थेट रेशीमबाग स्मृतिमंदिर येथे जातील. त्यानंतर दीक्षाभूमीला भेट देऊन ते माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सोलार एक्सप्लोजिव्हला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार प्रवीण दटके, संदीप जोशी आणि चरणसिंग ठाकूर उपस्थित होते.

बैठकीत पंतप्रधानांच्या स्वागतासाठी शहरभर जोरदार तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. ज्या मार्गावरून मोदी प्रवास करणार त्या मार्गावर आणि ४७ प्रमुख चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उत्साहपूर्ण स्वागत करावे, असे सांगण्यात आले. गुढीपाडव्याचा दिवस असल्याने पारंपरिक वेशभूषा, चौकांचे विशेष सजावट, स्वागत फलक आणि गुढ्या उभारून पंतप्रधानांचे स्वागत करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

या बैठकीला माजी आमदार अनिल सोले, विकास कुंभारे, राजू पारवे, सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, विष्णू चांगदे, माजी महापौर अर्चना डेहनकर, डॉ. राजीव पोतदार आणि जयप्रकाश गुप्ता यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
 


सम्बन्धित सामग्री