धुळे : धुळ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपये सापडल्याचं प्रकरण उघड झालं होतं. या प्रकरणात 9 दिवसानंतर अर्जून खोतकरांच्या पीएवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीए किशोर पाटीलसह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 कोटी 84 लाखांची रोकड शासकीय विश्रामगृहात सापडल्याने खळबळ उडाली होती.
धुळ्यातील गुलमोहर या शासकीय विश्रामगृहात 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळली होती. आमदारांची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 येथे ही रोकड सापडल्यामुळे एकच खळबळ माजली होती. आमदारांना देण्यासाठी ही रक्कम अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली असून खोली क्रमांक 102 मध्ये ती ठेवण्यात आल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासणीत गोटे यांचा दावा खरा ठरला होता.
हेही वाचा : Pune Crime: भरधाव चारचाकीनं बारा जणांना उडवलं; पुण्यातील धक्कादायक घटना
दरम्यान, या प्रकरणी नऊ दिवसानंतर अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीए किशोर पाटील यांच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आयकर विभागाकडून देखील स्वतंत्र तपास केला जात आहे.