नवी दिल्ली: कोविड-19चा प्रकोप कमी झाला असला तरी काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी, 1 जून 2025 रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 360 नविन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळ आणि कर्नाटकमधून एक-एक मृत्यूची नोंद झाली आहे.
देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 3,758 वर पोहोचली आहे. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक 1,400 सक्रिय रुग्ण आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 506 रुग्ण उपचार घेत आहेत. दिल्लीतील सक्रिय रुग्णसंख्याही वाढत आहे.
महाराष्ट्रात 65 नविन रुग्ण
महाराष्ट्रात रविवारी 65 नविन कोरोनाबाधित आढळले. यामध्ये पुण्यात सर्वाधिक 31 रुग्ण, मुंबईत 22, ठाणे जिल्ह्यात 9, कोल्हापूरमध्ये 2 आणि नागपूरमध्ये 1 रुग्ण आढळला. राज्यात आतापर्यंत 814 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 506 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत आणि 300 रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: FDA action on Zepto warehouse: झेप्टोच्या ऑनलाईन ग्रॉसरी गोदामावर FDA ची कारवाई; खराब अन्नसाठा आणि नियमभंगाचे प्रकार उघड
केरळमध्ये तरुणीचा मृत्यू
केरळमध्ये 24 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तिला अन्य गंभीर आजार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात 64 नविन रुग्ण आढळले असून सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत.
बंगालमध्ये 82 नविन रुग्ण
पश्चिम बंगालमध्ये 24 तासांत 82 नविन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 287 झाली आहे. या कालावधीत सहा रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ओडिशा आणि गुरुग्राममध्येही वाढ
ओडिशामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 12 वर पोहोचली असून सर्व रुग्ण सौम्य लक्षणांसह होम आयसोलेशनमध्ये आहेत. गुरुग्राममध्ये 4 नविन रुग्ण आढळले असून सध्या 12 रुग्ण सक्रिय आहेत. स्थानिक डॉक्टरांनी नागरिकांना फ्लू सारखी लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी आणि विलंब करू नये, असा सल्ला दिला आहे.
सरकारचा सतर्कतेचा इशारा
आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लक्षणे दिसल्यास त्वरीत तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असली तरी अति आत्मविश्वास न ठेवता खबरदारी घेणे गरजेचे आहे.