Sunday, August 17, 2025 01:37:26 AM

धक्कदायक बातमी: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 14 हरणांचा मृत्यू

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 8 दिवसांत 14 हरणांचा मृत्यू; अन्नातील संशयित विषबाधेचा तपास सुरु, अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता.

धक्कदायक बातमी पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 14 हरणांचा मृत्यू

पुणे: पुण्यातील कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील आठ दिवसांत तब्बल 14 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये आणि पुणेकरांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

संग्रहालयात सध्या 100 पेक्षा अधिक हरणे असून, त्यात मागील आठवडाभरात सलग मृत्यूचे प्रकार समोर आल्याने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. हरणांच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनश्याम पवार यांनी सांगितले की, हरणांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचे नमुने रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासणीचा अहवाल प्राप्त होणार असून, त्यानंतर हरणांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

हेही वाचा: बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना सरकारकडून दिलासा; मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा

या प्रकारानंतर महाराष्ट्र झू अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी देखील संग्रहालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. दरम्यान, प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून हरणांची निगा राखण्यासंबंधी खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी, मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अशा प्रकारची घटना भविष्यात टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री