मुंबई: कोकणातील गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतो आणि या सणानिमित्त मुंबई, ठाणे, पालघरसह राज्याच्या विविध भागातून लाखो चाकरमानी आपल्या गावाकडे रवाना होतात. त्यांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी एसटी महामंडळाने यंदाही मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे की, गणेशोत्सव 2025 साठी एसटी महामंडळ 5000 अतिरिक्त बस सोडणार आहे. या बसेस 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान कोकणाच्या विविध भागांकडे धावणार असून, प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेत ही सुविधा पुरवण्यात येणार आहे.
या बसेससाठी 22 जुलैपासून गट आरक्षण सुरू होणार आहे. प्रवाशांना आपल्या सोयीने आरक्षण करता यावे यासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाईटवर तसेच MSRTC Bus Reservation अॅप आणि थेट बसस्थानकांवरही आरक्षणाची सुविधा उपलब्ध असणार आहे. एसटी महामंडळाने याआधी आषाढी एकादशीसाठी 5200 जादा बसेस सोडल्या होत्या, त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठीही अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा: SHRAVAN 2025: श्रावणात ‘ही’ फुले चुकूनही महादेवाला अर्पण करू नका, अन्यथा होईल प्रकोप
यंदाच्या निर्णयानुसार, ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत आणि महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच, मुंबई, ठाणे व पालघर विभागातून या बससेवा उपलब्ध असणार आहेत.गणेशोत्सवादरम्यान एसटी सेवा सुरळीत राहावी यासाठी बसस्थानकांवर व मार्गांवर एसटीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी सतत कार्यरत राहणार आहेत. तसेच, कोकणातील मुख्य महामार्गांवर वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत, जे आपत्कालीन प्रसंगी तत्काळ सेवा देणार आहेत.
या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून, गणरायाच्या स्वागताची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे चाकरमानींच्या गणेशोत्सव यात्रेला निश्चितच दिलासा मिळणार आहे.