सोलापूर: करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, बुलढाण्याचे डॉ.शशिकांत खेडकर, दिपक पाटणे उपस्थित होते.
हेही वाचा: Ganeshostav 2025: पीओपी मुर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आणणार नवे धोरण
जयवंतराव जगताप म्हणाले:
शिवसेना पक्षात प्रवेश करण्यावर जयवंतराव जगताप म्हणाले की, 'एकनाथ शिंदे हे सर्वसामन्यांचे नेते आहेत. 2004 ते 2009 पर्यंत मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्वाला बघून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून, पक्ष बांधणीसाठी एकत्र येणार आहे. तसेच, ताकदीने काम करणार आहे. लवकरच करमाळा येथे बैठक घेऊन आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा घेणार आहोत'.
हेही वाचा: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; युवासेनेचा अल्टिमेटम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी सकाळी त्यांच्या 'एक्स'वर पोस्ट केली आहे. '#करमाळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जयवंतराव जगताप हे दोन वेळा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढवून ते विजयी झाले होते. 2019 साली विधानसभेला संजय मामा शिंदे यांना विजयी करण्यात आणि 2024 साली नारायणआबा पाटील यांना विजयी करण्यात जयवंतराव जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठे बळ मिळणार आहे.
यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सांगलीचे विठ्ठल पाटील, बुलढाण्याचे डॉ.शशिकांत खेडकर, दिपक पाटणे उपस्थित होते', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.