मुंबई : अकोल्यातील 62 वर्षीय चहा विक्रेता, आपल्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ, जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकला. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे जीवन संकटात आले आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक गर्तेत सापडले. हाताशी ना बचत, ना मालमत्ता, ना कुठला आधार, उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम जमवण्याचा कोणताच मार्ग त्यांच्या दृष्टीस पडत नव्हता. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून रुग्णावर तातडीने उपचार करण्यात आले. वेळीच उपचार मिळाल्याने आमच्या वडिलांचे प्राण वाचू शकले, अशी कृतज्ञता मुलाने वडिलांवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्यक्त केली.
संघर्षाचा प्रवास
मागील चाळीस वर्षांपासून हे वृद्ध गृहस्थ अकोला येथे चहा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. मुलाने तातडीने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांसंबंधी गंभीर आजार असल्याचे निदान झाले. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी नागपूरच्या विशेष रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा सल्ला दिला. नागपूरमध्ये तपासणी केल्यानंतर या उपचारासाठी 10 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. काळाचा घाला म्हणावे तसे वडिलांना उपचार मिळावे यासाठी पाठपुरावा करत असताना मुलाचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायांना गंभीर दुखापतही झाली. त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावे लागले. अशातच शेती नाही, मालमत्ता नाही आणि उत्पन्नाचे कोणतेही निश्चित साधन नसल्याने वडिलांवरील उपचारासाठी रक्कम उभारणे त्यांच्यासाठी अशक्य होते.
लोकप्रतिनिधींकडे धाव
अखेर, स्थानिक खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर ठपका
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची तातडीने मदत
प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने रुग्णाला तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. सोबतच कुटुंबियांनी धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. त्यांनी रुग्णाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीकरिता प्रयत्न सुरू केले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून शिवाय संवेदनशील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संवेदनशीलतेला अनुसरून उपचारासाठी आवश्यक असलेला खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, टाटा ट्रस्ट आणि सिद्धिविनायक ट्रस्ट यांच्या सहकार्यातून उभी करण्यात आली.
हे ऋण शब्दात व्यक्त करणे अशक्य
आम्हाला वडिलांच्या उपचारासाठी इतकी मोठी रक्कम उभी करणे अशक्य होते. आम्ही आमच्या वडिलांना गमावतो की काय अशी मनात भीती असतानाच, कक्षप्रमुख रामेश्वर नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रक्कम उभी राहिली आणि त्यातूनच आमच्या वडीलांचे प्राण वाचले. ही मदत आमच्याकरिता केवळ आर्थिक नाही, तर मानसिक आधार आणि आमच्या वडीलांना पुनर्जीवन देणारी आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि या संकटसमयी मदतीला धावून आलेल्या सर्वांचे आयुष्यभर ऋणी राहू अशी भावना मुलाने व्यक्त केली आहे.