पुणे: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, चौकशीदरम्यान गाडे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आली आहे.
“माझ्या बदनामीला जबाबदार कोण?” – पीडितेचा आक्रोश
स्वारगेट प्रकरणातील पीडित तरुणीने पुणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना थेट सवाल केला – “माझ्या बदनामीला जबाबदार कोण?” तिच्या या प्रश्नावर अधिकारीही काही उत्तर देऊ शकले नाहीत. तपासाची सूत्रे गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडित तरुणीशी संवाद साधला. यावेळी तिने पोलिसांवर रोखठोक सवाल करत तिच्या प्रतिष्ठेचे काय, असा मुद्दा उपस्थित केला.
हेही वाचा: गुंडांसोबत केक कापून पोलिसाचा वाढदिवस,कायद्याच्या रक्षकांनीच नियम मोडले!
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आरोपी दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरू आहे. पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला आरोपीचा मोबाइल जप्त करायचा आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने आपला फोन उसाच्या शेतात लपवल्याची शक्यता आहे. यापूर्वीही महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपांमुळे या फोनची तपासणी महत्त्वाची मानली जात आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणाने समाजात संतापाची लाट
ही घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली, जेव्हा 26 वर्षीय तरुणी स्वारगेट बसस्थानकात उभी असताना आरोपीने स्वतःला कंडक्टर असल्याचे सांगत तिला शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपीला 28 फेब्रुवारीला पहाटे त्याच्या गावी अटक करण्यात आली. तपासात आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अन्य पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.