Tuesday, July 01, 2025 07:19:05 AM

CM Devendra Fadanvis: वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा

देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देश दिले.

cm devendra fadanvis  वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची कालमर्यादेत गतिमान उभारणी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी त्वरित करण्याचे निर्देश दिले. "राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करा. यात वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये योग्य संतुलन राखत पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणाऱ्याचा मार्गदर्शन केले. "महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हा राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या धोरणांद्वारे सर्व भागांमध्ये विकासाची समान संधी निर्माण केली जावी," असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम येथे आज झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, आणि विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच प्रकल्पांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील १९ महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले गेले.

मुख्यमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश दिले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि निर्यात धोरणाला चालना देणारा ठरणार आहे. "वाढवण बंदर देशाच्या सागरी व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्या भूसंपादन आणि परवानगी प्रक्रियेला गती दिली जावी," असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

याचप्रमाणे, विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र सिंचनाखाली येईल आणि जलस्रोत व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. तसेच, वर्धा - नांदेड रेल्वे मार्ग आणि वडसा - गडचिरोली प्रकल्पाचे भूसंपादन वेगवान करण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्र्यांनी पुणे शहरातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्पाला गती देण्याची घोषणा केली. "या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल आणि वेळेची व इंधनाची बचत होईल," असे ते म्हणाले.

राज्यभरातील प्रकल्पांचा आढावा

राज्यभरातील मेट्रो, रेल्वे, महामार्ग, विमानतळ, बंदरे, सिंचन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांतील एकूण १९ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये निम्न पेडी सिंचन प्रकल्प, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, वांद्रे - वर्सोवा सि लिंक, ठाणे रिंग मेट्रो, पुणे मेट्रो - ३, पुणे रिंग रोड यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रामुख्याने प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, भूसंपादन, पुरवणी मागणी आणि कार्यवाही प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्याचे देखील त्यांनी सांगितले.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. "राज्य सरकार सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे," असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक प्रकल्पासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल आणि संबंधित विभागांनी प्रकल्पांचे कार्य वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री