Sunday, April 20, 2025 06:38:39 AM

नागपुरात हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता, 80 जणांना अटक, 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू

छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

नागपुरात हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता 80 जणांना अटक 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू

नागपूर : काल (सोमवार, 17 मार्च) नागपूरमध्ये अचानक उसळलेल्या दंगलसदृश परिस्थितीनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागासह काही संवेदनशील परिसरांमध्ये संतप्त जमावाने समाजविघातक कृत्य करत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी केली. या घटनेत अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली तसेच काही वाहनांना आगीच्या भक्षस्थानी सोडण्यात आलं. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं? 
छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याच्या मागणीमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दल यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील या संघटनांनी आंदोलन केलं. या आंदोलनामुळे दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसान हिंसाचारात झालं.मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एक मोठा गट जमला होता. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्याचवेळी विरोधी गटानेही प्रत्युत्तर म्हणून घोषणाबाजी केली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांना वेगवेगळं केलं आणि जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कालांतराने हा जमाव अधिक आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवरच दगडफेक सुरू केली.

यावेळी संतप्त जमावाने परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड केली आणि काही वाहनांना आगी लावल्या. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त मागवला. या प्रकरणात पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करत जवळपास 80 जणांना अटक केली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात मोठा राडा


हिंसक जमावाने केलेल्या तोडफोडीमुळे नागपूर पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळत कठोर पावलं उचलली. महाल परिसरात मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून रात्रीभर चाललेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 80 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या आरोपींवर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की, 'शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांकडून कठोर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोणत्याही समाजविघातक कृत्याला मुळीच माफ केलं जाणार नाही.' 

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागांचा समावेश आहे.संचारबंदीच्या काळात लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. उर्वरित नागपूरमध्ये मात्र जनजीवन सामान्य असून सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक 

नागपूरमधील तणावपूर्ण परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत नागपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित नागपूरकडे प्रयाण केलं असून ते आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. नागपूरमधील शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


सम्बन्धित सामग्री