मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कबुतरखान्यांमध्ये कबुतरांना खायला देण्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याच्या 107 प्रकरणांची नोंद केली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालानुसार, 3 ते 12 जुलै दरम्यान या उल्लंघनांप्रकरणी बीएमसीने 55,700 रुपये दंड वसूल केला आहे. दादर, माटुंगा, गोरेगाव, मालाड तसेच दक्षिण मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) आणि गेटवे ऑफ इंडिया येथील कबुतरखान्यांमधून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने 3 जुलै रोजी बीएमसीला शहरातील सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला देण्यावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. कारण त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि कबुतरखान्यांजवळ राहणाऱ्या रहिवाशांना श्वसनाचे आजार आणि अनेक अॅलर्जी होऊ शकतात. शिवसेना नेत्या आणि नामांकित आमदार मनीषा कायंदे यांनी 3 जुलै रोजी महाराष्ट्र विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता.
हेही वाचा -धक्कदायक बातमी: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 14 हरणांचा मृत्यू
51 कबुतरखान्या तात्काळ बंदी -
मनीषा कायंदे यांनी म्हटलं होतं की, कबुतरखान्यांचा कचरा आणि पंख श्वसनाचे आजार निर्माण करतात आणि त्यामुळे जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी धोका निर्माण होतो. यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, शहरातील सर्व 51 कबुतरखान्यावर तात्काळ बंदी घालण्यात येईल.
हेही वाचा - वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषारोपपत्र दाखल; दोषारोपपत्रात एकूण 11 जण आरोपी
यानंतर, बीएमसीच्या जी नॉर्थ वॉर्डने दादरमधील एका कबुतरखान्यात बेकायदेशीरपणे बांधलेले शेड पाडले. तसेच कबुतरांना खायला घालण्यासाठी प्रत्येकी 50 किलो वजनाचे सुमारे 25 पाकिटे जप्त केले. शहरातील 24 वॉर्डांमध्ये सार्वजनिक कबुतरखाने आहेत, त्यापैकी सर्वात प्रमुख दादर, माटुंगा, फोर्ट येथील जीओपी, चौपाटी आणि मोहम्मद अली रोड येथे आहेत. घनकचरा विभागाच्या नियमांनुसार बीएमसी नियुक्त नसलेल्या सार्वजनिक ठिकाणी जनावरांना खायला घालणाऱ्या नागरिकांना दंड आकारत येत आहे.