Sunday, June 15, 2025 11:54:12 AM

पंतप्रधान मोदींना मिळाले G7 शिखर परिषदेचे निमंत्रण! कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला फोन

कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या या पुढाकारामुळे ताणलेल्या भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे.

पंतप्रधान मोदींना मिळाले g7 शिखर परिषदेचे निमंत्रण कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला फोन
PM Modi received invitation to G7 summit
Edited Image

नवी दिल्ली: कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून G-7 मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या X हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी फोनवर बोलणे आनंददायी आहे. अलिकडच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच या महिन्याच्या अखेरीस कानानस्किस येथे होणाऱ्या जी7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत आणि कॅनडा हे दोलायमान लोकशाही देश आहेत जे लोकांमधील खोल संबंधांनी जोडलेले आहेत. परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नवीन उर्जेने एकत्र काम करू. शिखर परिषदेत आमच्या आगामी बैठकीची वाट पाहत आहोत.' 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्याशी फोनवर चर्चा; कोणत्या मुद्द्यांवर झाली खलबत?

भारत-कॅनडा संबंधांवर सुधारणार?  

दरम्यान, कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या या पुढाकारामुळे ताणलेल्या भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे. कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या कार्यकाळात नवी दिल्ली आणि ओटावा यांच्यातील संबंध अतिशय वाईट काळातून जात होते. कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येचा कट भारताविरुद्ध रचला होता, जो भारताने पूर्णपणे नाकारला होता. तेव्हापासून भारत आणि कॅनडातील संबंध बरेच बिघडले आहेत. भारत आणि कॅनडाने एकमेकांच्या राजदूतांना त्यांच्या देशांतून हाकलून लावले. यासोबतच, एकमेकांच्या देशांशी असलेले इतर अनेक प्रकारचे संबंधही तोडले. पण आता कार्नी यांच्या या विधानामुळे भारत-कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - Ukraine Russia War: ट्रम्पसोबत चर्चा केल्यानंतर काही तासांतच रशियाचा युक्रेनवर हल्ला; 5 जणांचा मृत्यू

G7 शिखर परिषद  - 

दरम्यान, कॅनडातील आगामी G7 शिखर परिषद 15 ते 17 जून दरम्यान अल्बर्टा प्रांतातील कनानास्किस प्रदेशात होणार आहे. ही परिषद कॅनडासाठी विशेष महत्त्वाची आहे, कारण ती G7 च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली जात आहे. या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट जागतिक शांतता, सुरक्षा, आर्थिक स्थिरता आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या मुद्द्यांवर चर्चा आणि सहकार्य करणे आहे. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, जपान, युनायटेड किंग्डम, इटली, कॅनडा आणि युरोपियन युनियन यात सहभागी होणार आहेत. भारत गेल्या 6 वर्षांपासून G7 मध्ये सहभागी होत आहे. आता भारत या शिखर परिषदेत 7 व्यांदा सहभागी होणार आहे.  
 


सम्बन्धित सामग्री