Henry The Oldest Crocodile : मगर हा जगातील प्राचीन प्राण्यांपैकी एक आहे. असे मानले जाते की, हा प्राणी लाखो वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहे. मगर म्हटलं की त्यांचा आक्राळविक्राळ जबडा आठवतो आणि अंगावर शहारे येतात! मजबूत जबडे असलेल्या मगरी त्यांच्या भक्ष्याचा पाहता-पाहता अगदी क्षणार्धात फडशा उडवतात. मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मगरींची त्यांचा स्वतःचा जबडा उघडण्याची क्षमता खूपच कमकुवत असते. तुमचा यावर विश्वासही बसणार नाही की, माणूसही मगरीचे तोंड आपल्या हातांनी दाबून बंद ठेवू शकतो. तर, आम्ही तुम्हाला ज्या मगरीबद्दल सांगणार आहोत, ती सामान्य मगर नाही.
या मगरीचे नाव हेन्री (Henry) आहे आणि तो जगातील सर्वात वयस्कर जिवंत मगर आहे. गेल्या वर्षी 16 डिसेंबर 2024 रोजी या मगरीने आपल्या वयाची 124 वर्षं पूर्ण केली. 1985 पासून दक्षिण आफ्रिकेतील क्रोकवर्ल्ड संवर्धन केंद्रात राहणाऱ्या हेन्री 10 हजारांहून अधिक मुलांचा बाप आहे. त्याचे वय आणि इतकी वर्षे जिवंत राहण्याची क्षमता शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करत आहे.
हेही वाचा - चक्क पाण्याच्या विहिरीत लागली आग.. रहस्य उलगडले तेव्हा संपूर्ण देशाचे नशीब पालटले!
नाईल प्रजातीची (नाईल नदीतील मूळ किंवा स्थानिक प्रजात) ही नर जातीची मगर 1903 मध्ये बोत्सवानाच्या ओकावांगो डेल्टामध्ये पकडली गेली होती. त्याच्या जन्माची तारीख कोणालाही माहिती नाही. परंतु, असे मानले जाते की, तिचा जन्म 1900 च्या सुमारास झाला होता. अशाप्रकारे, ही मगर एक शतकाहून अधिक जुनी असल्याचे म्हटले जाते. क्रोकवर्ल्डमध्ये हेन्रीची खूप काळजी घेतली जाते. त्याच्या सभोवतालचे वातावरण खूप शांत आहे आणि कदाचित हेच त्याच्या इतक्या मोठ्या प्रदीर्घ आयुष्याचे एक कारण असू शकते.
हेन्रीच्या कुटुंबात खूप मोठी वाढ
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतके वय असूनही, हेन्रीने 10 हजारांहून अधिक मुलांना जन्म दिला आहे. त्याच्यामुळेच केंद्रात मगरींची संख्या वाढत आहे. प्रजननात त्याचे अजूनही सक्रिय असलेले योगदान पाहून शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटते. सुमारे 700 किलो वजनाचा आणि 5 मीटर लांबीचा हेन्री आज या केंद्रात पृथ्वीवरील सर्वात मोठ्या मगरींपैकी एक आहे, जे पाहून येथे येणारे लोक आश्चर्यचकित होतात.
दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे?
असे मानले जाते की, मगरींमध्ये मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि त्यांच्या रक्तात विशेष प्रथिने असतात, जी त्यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय, सुरक्षित वातावरण हे देखील हेन्री इतके दिवस जगण्याचे एक कारण असू शकते. शांत आणि चांगले वातावरण प्राण्यांच्या दीर्घायुष्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. भक्षक, रोग किंवा इतर काही स्पर्धा नसल्यामुळे हेन्रीसारखे प्राणी अनेक दशके जगू शकतात.
हेही वाचा - तुफान पावसानंतर गावातला अख्खा पूलच गेला वाहून; नशीब दिवस होता.. नाहीतर..
हेन्रीवर संशोधन करणे कठीण आहे
शास्त्रज्ञांना अद्याप पूर्णपणे कळलेले नाही की, या मगरी इतके दिवस कशा जगू शकतात. हेन्रीसारख्या प्राण्यांवर संशोधन करणे कठीण आहे, कारण तो त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांपेक्षा जास्त काळ जगतो. त्याच्या 124 व्या वर्षापर्यंत त्याच्यावर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. मात्र, कोणताही एकच शास्त्रज्ञ इतकी वर्षे काम करू शकत नसल्यामुळे आणि जगू शकत नसल्यामुळे या संशोधनात अनेक अडचणी येत आहे. मात्र, ही मगर जगभरातील शास्त्रज्ञांना आणि प्राणीप्रेमींना आकर्षित आणि आश्चर्यचकित करत आहे.