मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज, 5 मे 2025 रोजी अधिकृतपणे जाहीर झाला. निकालाची घोषणा दुपारी 11 वाजता पत्रकार परिषदेत करण्यात आली. तर दुपारी 1 वाजता बारावीचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होतील. यंदा राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने परीक्षा दिली असून अनेकांना आपल्या गुणांबाबत खात्री पटत नसल्याने ‘रि-चेकींग’ (गुण पडताळणी) करण्याचा विचार आहे. त्यासाठी मंडळाने रीतसर मुदत, प्रक्रिया आणि शुल्क जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची असून, ही प्रक्रिया योग्य वेळी आणि काळजीपूर्वक पार पाडणे आवश्यक आहे.
रि-चेकींगसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 6 मेपासून 20 मे 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी पहिल्यांदाच महत्त्वाची अट घालण्यात आली आहे उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही फोटो कॉपी मिळवण्यासाठीही विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेची छायाप्रत ऑनलाइन, हस्तपोच किंवा रजिस्टर्ड पोस्टने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रत्येकी विषयानुसार वेगळे शुल्क आहे फोटो कॉपीसाठी ₹300, री-चेकींगसाठी ₹50 आणि पुनर्मूल्यांकनासाठी ₹300 तर छाया पत्रिकेसाठी ₹400 इतके शुल्क आहे. हे सर्व शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
हेही वाचा: यंदाचा बारावीचा निकाल 91.88 टक्के, कोकण विभागाची बाजी तर, लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल
मंडळाकडून हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, जे विद्यार्थी NEET, JEE, MHT-CET किंवा इतर प्रवेश परीक्षांना बसणार आहेत, त्यांची उत्तरपत्रिका तपासणी आणि छायाप्रत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेश पत्राची छायांकित प्रत आणि संबंधित शिक्षकांचा अभिप्राय अपलोड करावा लागेल. स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही सुसूत्रता राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा: 12th HSC Result 2025 Website Link: स्कोअरकार्ड पीडीएफ डाउनलोड होणार 'या' अधिकृत वेबसाइटवर
दरम्यान, यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनी आपली सरशी कायम ठेवली आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के असून मुलांची टक्केवारी 89.81 टक्के इतकी आहे. म्हणजेच मुली 5.07 टक्क्यांनी पुढे आहेत. मात्र, मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल किंचित कमी नोंदवला गेला आहे 91.88 टक्के. यावर शिक्षण विभाग आढावा घेणार असून, यंदाचा निकाल का घसरला याचे विश्लेषण लवकरच होणार आहे.