Athawale Slams Raj Thackeray:केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'राज ठाकरे यांची भूमिका रोज बदलणारी आहे, त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेतले तरी काही उपयोग होणार नाही,' असे वक्तव्य करत त्यांनी थेट टोला लगावला आहे.
ते सांगलीच्या जत येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आठवले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे आमच्या म्हणजेच महायुतीसोबत होते. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते, आणि त्यावेळी आमच्या अधिक जागा निवडून आल्या.' हे उदाहरण देत त्यांनी सांगितले की राज ठाकरे यांच्यामुळे काहीच लाभ होत नाही.
हेही वाचा: ठाकरे गटाला नाशिकमध्ये जबर धक्का; बडगुजर, घोलपांसह अनेक नेते भाजपमध्ये
रामदास आठवले यांनी असेही सांगितले की, 'राज ठाकरे यांची भूमिका स्थिर नाही. ते नेहमी वेगवेगळे निर्णय घेत असतात. त्यांची भूमिका एकसंध राहिलेली नाही. त्यामुळे अशा व्यक्तीला महायुतीत घेण्याचा काही उपयोग नाही.' त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केलं की, 'राज ठाकरे पूर्णपणे आमच्या सोबत येतील याची शाश्वती नाही. त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही.'
तसेच त्यांनी पुढे म्हणाले की, 'महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आहेच. त्यामुळे आम्हाला वेगळ्या भागीदारांची गरज नाही. राज ठाकरे यांना घेऊनही काही विशेष फरक पडणार नाही.'
हेही वाचा: नवी मुंबई वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस; शव गुंडाळण्यासाठी दोन हजारांची मागणी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी नमूद केलं की, 'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र आले तरी मुंबईत काही विशेष परिणाम होणार नाही. कारण मुंबई ही बहुभाषिक शहर आहे आणि येथे दलित मतदारसंघही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे महायुतीचाच झेंडा फडकेल असा आमचा विश्वास आहे.'
या सर्व वक्तव्यांमुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.