सोलापूर: सोलापूर शहर आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव कमावलेले प्रख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले आहे. 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलवरून चौघांना कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) चा तपास सुरू आहे.
डॉ. वळसंगकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात जवळपास 25 वर्षे सेवा केली. हजारो रुग्णांवर उपचार करत त्यांनी एसपी न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूट सारख्या प्रगत संस्थेची स्थापना केली. पण मृत्यूसमयी त्यांच्या हाती केवळ ओपीडीचे अधिकार होते. त्यांचे रुग्णालयातील निर्णयक्षम अधिकार संपवले गेले होते, ज्यामुळे ते मानसिक तणावात होते, अशी माहिती अटकेतील मनीषा माने हिने पोलिसांना दिली आहे.
याप्रकरणी मनीषा माने हिला मुख्य आरोपी म्हणून पाहिले जात आहे. डॉक्टरांच्या खिशातून सापडलेल्या सुसाईड नोटवरून तीच मुख्य संशयित ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपास अधिक खोलात सुरु असून, आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा: साटेली भेडशीतील अनधिकृत मदरसामध्ये आढळल्या दोन तलवारी; आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी
या प्रकरणातील आणखी एक धक्का म्हणजे डॉ. वळसंगकर यांची मोठ्या प्रमाणातील आर्थिक गुंतवणूक. त्यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, गेल्या 15 ते 20 वर्षांत त्यांनी म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून तब्बल 160 कोटी रुपये गुंतवले होते. शेअर बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे 300 कोटींपर्यंत पोहोचले असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांचे मत आहे.
पण या गुंतवणुकीचा वारस कोण? डॉ. वळसंगकर यांचे मृत्युपत्र अद्याप समोर आलेले नाही. योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच वारसदारांना ही रक्कम मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एकीकडे डॉक्टरांच्या आर्थिक दूरदृष्टीची चर्चा सुरु असतानाच, दुसरीकडे त्यांच्या आत्महत्येने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत. आयुष्यभर मेंदूचे आजार बरे करणाऱ्या डॉक्टरने स्वतःच्या मेंदूत गोळी झाडून आत्महत्या का केली, हा प्रश्न अजूनही सगळ्यांच्या मनात घोंगावत आहे.
पोलिस तपास, आर्थिक गुंतवणुकीची चौकशी, आणि मानसिक तणावामागची पार्श्वभूमी यावर पुढील काही दिवसांत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या मात्र सोलापूर आणि राज्यातील वैद्यकीय व गुंतवणूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.