Sunday, August 17, 2025 04:52:48 AM

अज्ञातांकडून पत्रकारांसह वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला; 11 जणांवर गुन्हे दाखल

4 जुलै रोजी सायंकाळी अनधिकृत बांधकामाची बातमी करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञातांकडून पत्रकारांसह वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला 11 जणांवर गुन्हे दाखल

अमोल दरेकर. प्रतिनिधी. शिरूर: आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथे महिला पत्रकार आणि वृद्ध शेतकऱ्यावर हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 4 जुलै रोजी सायंकाळी अनधिकृत बांधकामाची बातमी करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत आणि कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा: शिंदेंच्या ऑफिसबाहेर कचऱ्याचा ढिग; 'जय महाराष्ट्र'च्या प्रतिनिधीवर अधिकाऱ्याची अरेरावी

नेमकं प्रकरण काय?

फिर्यादी सुधाकर बाबुराव काळे (वय 69, रा. मंचर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुधाकर काळे आपल्या कुटुंबीयांसह महिला पत्रकार स्नेहा बारवे यांच्यासोबत निघोटवाडी येथे अनधिकृत बांधकामाची माहिती घेण्यासाठी गेले होते. तेव्हा, पांडुरंग मोरडे, त्याचे दोन्ही मुले प्रशांत आणि निलेश मोरडे, यासह इतर 8-9 अनोळखी लोकांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यादरम्यान, आरोपींनी महिला पत्रकार स्नेहा बर्वे, सुधाकर काळे, त्यांचे मेहुणे विजेंद्र थोरात आणि मुलगा संतोष काळे यांना लाकडी दांडके, प्लास्टिकचे गाजर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाही तर सर्वांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

या घटनेनंतर मंचर पोलीस ठाण्यात सुधाकर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री