मुंबई : महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २८८ पैकी २८३ जागांकरिता उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने १४८ उमेदवार जाहीर करत चार जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. शिवसेनेने ७८ उमेदवार जाहीर करत दोन जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ५१ उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस मंगळवार २९ ऑक्टोबर २०२४ हा आहे. संध्याकाळी पाच पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. यामुळे पुढील काही तासांत महायुती उर्वरित पाच जागांबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजपाची चौथी यादी जाहीर
भाजपाने पहिल्या यादीतून ९९, दुसऱ्या यादीतून २२, तिसऱ्या यादीतून २५ आणि चौथ्या यादीतून दोन असे एकूण १४८ उमेदवार जाहीर केले. तसेच चार जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. बडनेराची जागा भाजपाने रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला सोडली आहे. या जागेवरुन रवी राणा निवडणूक लढवणार आहेत. गंगाखेडची जागा भाजपाने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडली आहे. मुंबईतील कलिनाची (कालिना) जागा भाजपाने रामदास आठवलेंच्या रिपाईंला सोडली आहे. याव्यतिरिक्त शाहुवाडीची जागा भाजपाने विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षाला सोडली आहे.
शिवसेनेची तिसरी यादी जाहीर
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी
शिवसेनेने पहिल्या यादीतून ४५ दुसऱ्या यादीतून २० आणि तिसऱ्या यादीतून १३ असे एकूण ७८ उमेदवार जाहीर केले. तसेच दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. हातकणंगलेच्या जागेवरुन जनसुराज्य पक्षाचा आणि शिरोळ्यातून राजश्री शाहुविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या यादीतून ३८, दुसऱ्या यादीतून ७, तिसऱ्या यादीतून ४ आणि चौथ्या यादीतून २ असे एकूण ५१ उमेदवार जाहीर केले.