नवी दिल्ली: सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एमसी मेरी कोमने घटस्फोटाची पुष्टी केली आहे. मेरी कोमने बुधवारी तिच्या वकिलामार्फत जारी केलेल्या कायदेशीर निवेदनात ओंखोलोर कोमपासून घटस्फोट झाल्याचे सांगितले आहे. तसेच हितेश चौधरीसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाच्या अफवा निराधार असल्याचे म्हटले आहे.
मेरीच्या वकिलाने जारी केले निवेदन -
मेरीच्या वकिलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'या अटकळांना आणि चुकीच्या माध्यमांच्या वृत्तांना लक्षात घेता, मी पुढील स्पष्टीकरण देऊ इच्छितो की एम.सी. मेरी कोम आणि ओंखोलर कोम आता विवाहित नाहीत. 20 डिसेंबर 2023 रोजी दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या आणि कुळातील नेत्यांच्या उपस्थितीत कोम प्रथा कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. तसेच माझ्या क्लायंटचे हितेश चौधरी किंवा इतर कोणाशीही प्रेमसंबंध असल्याच्या अफवा स्पष्टपणे नाकारल्या जातात आणि कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांचा प्रचार करू नये,' असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - स्वतःच लोक मारतात आणि पाकवर आरोप करतात; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला
खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करू नका -
मेरीने माध्यमांना तिच्या खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करण्यासही मनाई केली. मेरीच्या वकिलाने सांगितले की, 'गेल्या दोन वर्षांपासून, माझ्या क्लायंटला तिच्या वैयक्तिक आयुष्यात, विशेषतः तिच्या माजी पतीसोबत, खूप आव्हानात्मक काळातून जावे लागत आहे. या कठीण काळात, माझ्या क्लायंटने तिच्या मित्रांना, चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती केली आहे की, त्यांनी तिला या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेली जागा आणि गोपनीयता द्यावी.'
हेही वाचा - 'दहशतवाद सहन केला जाणार नाही, पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाका'; सौरव गांगुली यांची मागणी
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'ही सूचना सर्व माध्यम संघटनांना, सर्व स्वरूपात, माझ्या अशिलाबद्दल निराधार अनुमाने लावण्यापासून दूर राहण्याची औपचारिक विनंती आहे. मेरी कोमच्या गोपनीयतेचा आणि वैयक्तिक जागेचा मीडियाने आदर करणे महत्त्वाचे आहे.' या संदर्भात मणिपूरमध्ये आधीच पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.