Thursday, May 29, 2025 04:15:30 PM

‘भुजबळांचा वापर करून मराठा-ओबीसीत दंगल घडवणार’ ; मनोज जरांगे पाटलांचा महायुतीवर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर थेट आरोप करत म्हटलं की, छगन भुजबळ यांचा वापर करून मराठा-ओबीसी संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.

‘भुजबळांचा वापर करून मराठा-ओबीसीत दंगल घडवणार’  मनोज जरांगे पाटलांचा महायुतीवर आरोप

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, छगन भुजबळ यांचा वापर करून देवेंद्र फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

छगन भुजबळ यांना नुकतीच मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं असून, विरोधकांनी यामागे राजकीय डाव असल्याचे सूचित केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, 'राज्यावर असं कोणतं संकट आलं होतं की भुजबळांना मंत्री करावं लागलं? फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी किती द्वेष आहे हे यातून दिसून येतं.'

हेही वाचा: रूपाली चाकणकर यांच्या समर्थकांचा धमकीचा ऑडिओ व्हायरल; रोहिणी खडसेंची तीव्र टीका

जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं की, फडणवीस यांचा खरा उद्देश मराठा आरक्षणाला विरोध करणे आणि समाजात फूट पाडणे हा आहे. 'भुजबळांना मंत्री करून त्यांनी पुन्हा मराठा-ओबीसी वाद भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याआधीही त्यांनी भुजबळांच्या सभा राज्यभरात घडवल्या आणि तलवारी काढण्यासारख्या टोकाच्या भाषा वापरायला लावल्या होत्या,' असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना मंत्रिपद दिलं गेलं, असा संशयही व्यक्त होत आहे. जरांगे पाटलांच्या मते, 'फडणवीस हे एक प्रकारे शिंदे आणि अजित पवार यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी रणनीती आखत आहेत.'

ते पुढे म्हणाले, “मराठा आणि ओबीसी समाजातील सामान्य लोकांनी आता सत्य समजून घ्यायला हवं. एकमेकांमध्ये फूट पाडून सत्तेवर टिकून राहण्याचा हा प्रयत्न आहे. पण आम्ही अशा फूटपट्टीला बळी पडणार नाही.”

राज्यातील राजकीय वातावरण आधीच तंग असून, अशा वक्तव्यांमुळे आणखी पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सरकारकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाला जोर येण्याची शक्यता आहे. यापुढे सरकार काय भूमिका घेते आणि राजकीय पक्ष यावर कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


सम्बन्धित सामग्री