पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि मेहुणे सुशील हगवणे यांना सात दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी, पहाटे 4:30 वाजता बावधन पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. वैष्णवी यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, 'हुंड्यासाठी तिचा छळ करून मृत्यू करण्यात आला आहे'.
गेल्या सात दिवसांपासून पोलीस या दोघांच्या शोधात होते. अखेर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत पोलिसांचं कौतुक केलं आहे तसेच कुणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही दिले आहे.
हेही वाचा: वैष्णवी आणि मयुरीच्या कुटुंबीयांनी केला हगवणे कुटुंबाबद्दल मोठा खुलासा
रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया:
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'आरोपींना अटक करण्यात आली आहे. आम्ही पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाच्या वतीने स्वतःहून तक्रार दाखल केली होती. पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन आरोपी सासू (लता हगवणे), नणंद (करिष्मा हगवणे), नवरा (शशांक हगवणे) पोलीस कोठडीत आहेत, तर सासरा आणि दीर असे दोन आरोपी फरार होते'.
पुढे रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'सासरा (राजेंद्र हगवणे) आणि दीर (सुशील हगवणे) यांची अटक झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही पहिल्याच दिवशी सुमोटो तक्रार दाखल केली होती. पाचही आरोपींवर गुन्हा नोंद आहे. तीन आरोपी अटकेत असताना दोन आरोपी फरार होते, त्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी उत्तमपणे स्वतःचं पथक, क्राईम आणि सायबर टीम यांनी सर्व फरार आरोपींना शोधण्याचं काम सुरू ठेवलं होतं. मात्र, शुक्रवारी सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, कायदा सुव्यवस्था चोखपणे काम करत आहे'.
हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सांगली दौऱ्यावर
'काही प्रमाणात आपलीही जबाबदारी आहे. कोणालाही अशा प्रकारे हुंड्याचा त्रास सहन करावा लागू नये. ज्याप्रमाणे बालविवाहाविरुद्ध कायदा आहे, तसेच प्रसूतीपूर्व चाचणीविरुद्ध कायदा आहे, अगदी त्याचप्रमाणे हुंडा प्रतिबंधक कायदाही आहे. त्यामुळे नागरिक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. हुंडा देणारेही तेवढेच दोषी आहेत जितके ते मागणारे आहेत. म्हणून हुंडा देऊ नये', असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
'जर आरोपींचा शोध घ्यायचा नसता किंवा त्यांना पळून जायचे नसते तर त्यांना आजही अटक झाली नसती. यामध्ये अनेक गोष्टी उघडकीस येतील. पण पोलिस पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत होते. पोलिसांनी सांगितले होते की, ''जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांचे लोकेशन मिळेल तेव्हा आम्ही तिथे पोहोचेपर्यंत ते निघून गेलेले असायचे''. पहिल्या दिवसापासून पोलिस तपास सुरू आहे. कारवाई सुरू आहे. कोणालाही पाठिंबा देण्याचा कोणताही हेतू नाही. जो चुकीचा आहे तो चुकीचाच आहे, गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे ही विकृती ठेचून काढायची आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपींवर कारवाई होणार आहे', असं रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली.